सरकारने सगळ्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता म्हणजेच DA (Dearness Allowance) ३% ने वाढवणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या नियमांनुसार होणार असून, त्यामुळे DA ५८% पर्यंत पोहोचेल. या वाढीचा फायदा जवळपास ४८ लाख कर्मचारी आणि ६६ लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.
ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होईल. मात्र मंत्रिमंडळाची मंजुरी सप्टेंबरमध्ये मिळाल्यानंतर, ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्टची थकबाकीही मिळेल. म्हणजेच एकाच वेळी वाढलेला पगार आणि दोन महिन्यांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.
महागाई भत्ता म्हणजे काय, हेही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर – बाजारात वस्तूंच्या किमती वाढल्या, तर त्याचा भार कर्मचाऱ्यांच्या खिशावर येतो. हा भार कमी करण्यासाठी सरकार दर महिन्याला अतिरिक्त रक्कम भत्त्याच्या रूपात देते. यालाच महागाई भत्ता म्हणतात.
सरकारने याशिवाय ८व्या वेतन आयोगासाठी तयारी सुरू केली आहे. हा आयोग भविष्यात कर्मचार्यांचे पगार आणि भत्ते वाढवण्यासाठी नवे नियम ठरवेल. यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना अधिक स्थैर्य मिळेल.
सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा खर्चाचा भार कमी होईल, पेन्शनधारकांना आधार मिळेल, आणि सर्वांचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे ही वाढ एकप्रकारे दिवाळीची भेट ठरणार आहे.